Saturday, October 20, 2018

कॉफीची गंगा

हि कथा ११ जून २०११ रोजी माझ्या इतर ब्लॉगवर तसेच फेसबुकवर प्रसिद्ध झाली होती. पुरुज्जीवीत करण्यासाठी व आग्रहास्तव पुन्हा या ब्लॉग वर लिहीत आहे. 


मला पावसाळ्यात नेहमीच हा प्रसंग आठवतो. मी माझ्या मुंबईचा दाखवलेला आणि सिद्ध केलेला मोठेपणा मला आजही सुखाऊन जातो. मी लहान म्हणजे ८-९ वर्षाचा असताना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावाला महाडला गेलो होतो. गावी मस्त दोन महिने राहिल्यावर पुन्हा मुंबईला यायला निघालो, तेंव्हा मला गावच्या काही मित्रांनी आणि माझ्या दादाने मस्करीत चिडवलं कि कशाला मुंबईला जातोस. आहे काय असं त्या मुंबईत..? इकडे पावसाळ्यात खूप मजा असते. नदीवर पोहायला जायचं, मासे पकडायचे, खेकडी पकडायची, हिरव्यागार रानात फिरायचं. आणि त्या मुंबईत काय ठेवलंय. मी लहान होतो त्यामुळे मला मस्करी समजली नाही. मला राग आला आणि मुंबईबद्दल असं ऐकल्यावर माझा स्वाभिमानही दुखावला. मी त्यांना सांगितलं. कि मुंबईत फिरलायत का कधी..? कधी पाहिलं नसेल असं सगळं काही आहे. त्यांनीही मला मुद्दाम म्हंटल, 'कि आहे ते सगळं बाकी वेळी पण पाहता येतं. पावसाळ्यात पाहण्यासारखं काय आहे?' मला पटलं. पण हार मानेल तो मी कसला. मी त्यांना सांगितलं, "कि पावसाळ्यात तिकडे "कॉफीची गंगा" येते. तुम्ही कधी पाहिलेय का...?"

हा नवीनच शब्द त्यांनी ऐकला. म्हणजे काय असं त्यांनी मला विचारलं. पण मी सांगितलं कि ते बघितल्यावरच समजतं. ज्याला कोणाला बघायची असेल त्यांनी मुंबईला चला. ते माझ्यावर हसायला लागले, आणि मी काहीतरी फेकतोय असं म्हणायला लागले. मी त्यांना म्हणालो, "वेड्यानो खूप मजा येते आमच्या कॉफीच्या गंगेत. ती जास्त वेळ नसते आणि कधीकधीच येते." त्यांना मी काहीतरी फेकतोय असंच वाटलं. पण मी माझ्या म्हणण्यावर ठाम होतो.

मी गावावरून मुंबईला आलो. शाळा सुरु झाली, नवीन वर्ग, नवीन पुस्तक आणि माझ्या मजेत मी ते सगळं विसरलो. जुलै महिन्यात दादा काही कामासाठी मुंबईला आला. मला भेटल्यावर म्हणाला, कि तुझी "कॉफीची गंगा" पाहायला आलोय. कुठे आहे मला दाखव. मी त्याला म्हंटल कि लगेच नाही दिसणार थोडे दिवस थांब. त्याचं काम होतं त्यामुळे तो थांबणारच होता. तो पूर्ण आठवडाभर आम्ही फिरत होतो. चौपाटी, राणीची बाग, गेट वे ऑफ इंडिया सगळं फिरवलं त्याला. आठवडा भर पाऊस काय जास्त नव्हता. रिम-झिम यायचा. पण मी मोठ्या पावसाची अपेक्षा करत होतो. त्याने मला बऱ्याचदा विचारलं, आणि फेकड्या काय पण फेकत असतो असं पण चिडवलं. पण सहा-सात दिवसांनी एकदाचा मोठा पाऊस आला. मुंबईची अवस्था मोठ्या पावसात खूप वाईट असते हे कोणाला सांगायला नको . जरासा मोठा पाऊस आला तरी मुंबईतल्या सखल भागात घरात पाणी शिरतं. 

मी डोंगराच्या पायाशी राहायचो, आजही तिकडेच राहतो पण बराचसा बदल झाला आहे. माझ्या घराजवळ पाऊस आला कि डोंगरावरून भरपूर पाणी येते, नाले आणि रस्ते पूर्ण भरून वाहू लागतात. त्या पाण्याला इतका वेग असतो कि कोणता माणूस जरी त्यामध्ये सापडला तरी सहज वाहून जाईल. ते पाणी डोंगरावरून येतं त्यामुळे त्या मातीचा रंग आणि नाल्यातला पाण्याचा काळा रंग हे एकत्र झाल्याने त्याचा रंग कॉफी सारखा होतो. हे पाणी वाहू लागलं कि जास्त उंचावर नसलेल्या घरात पाणी शिरत आणि त्यांची तारांबळ उडते. कचऱ्यामुळे ते पाणी अडून राहतं. म्हणून लोक हातामध्ये मोठ्या काठ्या घेऊन घराबाहेर येतात आणि जसं जमेल तसा कचरा बाजूला करतात. त्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या मजेदार गोष्टी वाहत असतात. कोणी पाण्यात धडपडत असतं तर कोणी घाबरून बाजूला भिजत उभे असतात. कुत्रे आणि दुसरे कोणते प्राणी नसले तरी डुक्कर ह्या पाण्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडत असतात.

माझं घर दुमजली असल्याने आम्ही सगळे ग्यालरीमध्ये उभे राहून ही सगळी मजा पाहत असायचो. आणि कोणाला थंडी वाजते का...? कॉफी देऊ का..? असं गमतीने म्हणायचो. पाण्याचा वेग कमी झाला कि त्यामध्ये होड्या सोडायचो. ही सगळी मजा मी त्या दिवशी दादाला दाखवली आणि त्याला सांगितलं कि हीच ती "कॉफीची गंगा". त्यानेही माझ्यापुढे हात जोडले, आणि गावाला गेल्यावर सगळ्यांना सांगितले. त्याला हि कदाचीत माझे म्हणणे पटले होते. आणि आपण जिकडे राहतो तिकडे 'जसा आनंद घेता येईल तसा तो घ्यायचा' ही माझी कल्पना ही त्याला आवडली असेल. त्यानंतर जेंव्हा मी पुन्हा गावाला गेलो तेंव्हा सर्वांनी आवडली तुझी कॉफीची गंगा असंच सांगितलं. आजही जेंव्हा मला ते आठवतं तेंव्हा मी स्वतःवरच हसतो. आणि आजही मला माझ्या मुंबईचा अभिमानाच वाटतो. निसर्गाची मजा तर सगळेच अनुभवतात पण त्यातून काही निराळी मजा अनुभवायची असेल तर आमची मुंबईच श्रेष्ठ आहे.


                                                                                                                               - रोशन मोरे  

Thursday, October 18, 2018

प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा

अध्यक्षीय मनोगत व प्रवासवर्णन



संकल्प गणेशोत्सवाचा २०१८

प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा..



चंद्रकोर प्रतिष्ठानच्या स्थापनेनंतरचे तिसरे वर्ष. स्थानिक पातळीवर खूप उंच उपक्रम राबवले गेले पण त्यातून समाधान काही लाभेना. परंतु यातील संकल्प गणेशोत्सवाचा हा एक उपक्रम असा होता कि ज्यात अतीव समाधान व प्रोत्साहन मिळत होते. पण हा उपक्रम विभागात साजरा होणार नव्हता म्हणून ज्यांना फक्त मिरवायचे आहे त्यांचा प्रतिसाद तसा कमीच व हे अपेक्षित होते. काहीही असो.. तोलमोल केले तेंव्हा लक्षात आले कि सोबत कोणी असो वा नसो हेच सत्य आणि सुंदर आहे. ज्या उद्देशाने प्रतिष्ठान स्थापन झाले होते त्याहिपेक्षा काही उत्तम आणि सुंदर करता येऊ शकते हे लक्षात आले आणि मग बडेजाव करणाऱ्या कार्यक्रमात मन रमेना.

महिन्याला आता काय नवीन असे विचारणारे व त्यानुसार सतत काहीतरी कार्यक्रम करत राहणारे प्रतिष्ठान आता शांत झाले. मुळात ज्यांच्यासाठी कार्यक्रम राबवायचे त्यांना याची जाण नव्हती, उलट विरोधच अधिक वाढू लागला होता. हा मार्ग एक दिवस आता शारीरिक लढाईवर घेऊन जाणार असे चित्र निर्माण झाले होते. पण सुसंस्कृत पिढीने असे हातापाईवर येणे हे देखील अशोभनीय आहे याची समजही स्वतःला घालून घेतली आणि प्रतिष्ठानचे स्थानिक कार्यक्रम एक एक करत कमी करू लागलो. 

पण दुसऱ्या बाजूने संकल्प गणेशोत्सवाचा हा एकमेव उपक्रम मात्र अपेक्षेहून अधिक बहरू लागला होता. मग सर्व कार्यक्रमांवर खर्च होणारी आर्थिक व शारीरिक शक्ती या एकाच कार्यक्रमात एकवटायची व यापुढे कोणताही कार्यक्रम साजरा केला तरी तो शैक्षणिक सदरातच साजरा करायचा असे एकमताने ठरले. संकल्प गणेशोत्सवाचा २०१८ या उपक्रमाला नवीन उत्साह मिळाला. 

संकल्प गणेशोत्सवाची दोन वर्ष रा. जि. प. शाळा आदई, ता पनवेल या शाळेला भेट दिली होती. पहिल्या वर्षी वह्या व पेन आणि दुसऱ्या वर्षी गणवेश असे शैक्षणिक पातळीवर आवश्यक साहित्य देऊन हा उपक्रम साजरा केला होता. यातच भर म्हणून शिवजयंती साजरी करताना विद्यादीप विद्यालय या स्थानिक शाळेला ग्रंथ दिंडी प्रदान केली होती. यावर्षी मात्र काही मित्रांनी विचारणा केली व त्यांच्या संस्थेतर्फे आदईच्या शाळेला मदत करण्याची इच्छा बोलून दाखवली. कोणीतरी या उपक्रमात उतरण्यास तयार आहे याचे समाधान लाभले व हि शाळा त्या मित्राला दिली.


आदई शाळेत साजरा झालेला संकल्प गणेशोत्सवाचा २०१७

आदई शाळेत साजरा झालेला संकल्प गणेशोत्सवाचा २०१६

या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी दुसऱ्या शाळेची शोधमोहीम सुरु असताना भिवपुरीहून गारबिट-माथेरान ट्रेकच्या वाटेवर असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या चिंचवाडी, ता. कर्जत व सागाचीवाडी, ता. म्हसळा या दोन शाळा नजरेत आल्या. भिवपुरीहून पायी चालत तब्बल २ तास अंतरावर असणाऱ्या या शाळा होत्या. गावाकडे व शाळेकडे वाहने जायला रस्ता नाही. शाळेचे गुरुजी रोज हि पायपीट करत विद्यार्थ्यांसाठी हा पल्ला पार करतात हे माहित झाले आणि या शाळेला भेटायची ओढ लागली. एका शाळेला शैक्षणिक साहित्य व दुसऱ्या शाळेला ग्रंथदिंडी देण्याचे शाळेच्या गुरुजींच्या सल्ल्याने मान्य केले.

गणेशोत्सवात सर्व साहित्य जमा झाले व शाळेला भेटण्याचा दिवस उजाडला. घाटकोपरवरून भिवपुरीकडे लोकलने प्रवास सुरु केला, लोकलमध्ये एका मित्राचा वाढदिवस साजरा करून प्रवासाचा आनंद व उत्साह वाढला होता. सकाळी ८ वाजता आम्ही भिवपुरी स्टेशनला उतरलो. पण आता खरी लढाई होती, कारण शैक्षणिक साहित्याचे प्रत्येकी किमान १० किलो वजन घेऊन १५०० फूट उंच डोंगरावर चढून जायचे होते. परंतु १७ जणांची तुकडी हे दिव्य करण्यास सज्ज होती. ३०० फुटांचा पल्ला गाठला आणि सर्वजण थकले त्यातच सूर्यदेवाची ऑकटोबर हिट आमच्यावर अन्याय करत होती. पाणी - इलेक्ट्रोल हे मनाचे सोपस्कार पार पडले आणि पुढील प्रवास सुरु झाला. आणखी १०० फूट चढल्यावर पुन्हा सगळे थांबले. आता फक्त १० मिनिटे, ५ मिनिटे असे करत करत आम्ही चढ पूर्ण केला आणि एका पठारावर येऊन थांबलो. पण अजूनही १.५ किलोमीटर इतके अंतर बाकी होते. ते चालण्यापूर्वी कांदेपोह्यांचा आणि सोबतच छायाचित्रांचा खेळ रंगला आणि थकवा कमी झाला. काही काळ विश्रांती झाल्यावर पुढच्या प्रवासाला सुरवात झाली. 




लोकलमध्ये एका मित्राचा वाढदिवस साजरा करून प्रवासाचा आनंद व उत्साह वाढला होता.




चढ पूर्ण केला आणि एका पठारावर येऊन थांबलो.

काही अंतरा प्रवास केल्यावर शाळेची दोन मुले आमची वाट पाहत उभी आहेत असे दिसले. आम्ही त्यांच्या नजरेत पडताच हि मुले शाळेच्या दिशेने धावायला लागली "गुरुजी, पाहुणे आले" हि हाक त्यांनी गुरुजींना दिली. गावापासून १०० मीटरच्या अंतरावर असणारी शाळा गावात येणाऱ्यांचे स्वागत करायला वाटेत उभी होती. शाळेत दोन वर्ग आणि शाळेमागे लहानसे स्वच्छतागृह एवढीच हि शाळा. पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गाचा ४३ विद्यार्थ्यांचा पट असणारी हि शाळा तालुक्यातील सर्वाधिक पट असणारी शाळा असल्याचे गुरुजीनीं सांगितले. शाळा हस्तकलेने सुंदर सजवली होती. भिंतींवर देशाची, राज्याची, मंत्रिमंडळाची प्राथमिक माहिती व पाढे लिहलेले होते. 

गावापासून १०० मीटरच्या अंतरावर असणारी शाळा गावात येणाऱ्यांचे स्वागत करायला वाटेत उभी होती.

शाळा हस्तकलेने सुंदर सजवली होती.
शाळेत पोहोचल्यावर चिमुकल्या हातांनी पाण्याचा ग्लास पुढे आला आणि सगळा थकवा शाळेबाहेरच राहिला. "जल अमृत आहे" असे का म्हणतात हे खऱ्या अर्थाने आमच्या लक्षात आले. अधिक वेळ न घालवता आम्हीही वह्या व शैक्षणिक साहित्य टेबलावर लावून घेतले. समोर गणरायाची आणि शिवरायांची मूर्ती ठेवली. गुरुजींनी गणरायाला पुष्पहार अर्पण केला आणि प्रार्थना सुरु झाली. "तू बुद्धी दे.. तू तेज दे.. नवचेतना विश्वास दे.. जे सत्य सुंदर सर्वथा.. आजन्म त्याचा ध्यास दे.." मुखातून या शब्दांबरोबरच डोळ्यातून अश्रू कधी तरळले हे कळलेच नाही. शहरात निर्दयी जगणाऱ्या माणसांच्या मनातही एवढा भाव असतो हे समजण्यासाठी हि परीक्षा देणे गरजेचे होते. प्रार्थना संपवून लगेचच शैक्षणिक वाटप झाले. त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजेच गणरायाचा आशीर्वादच हे सांगायला आता आम्हाला कोणाचीच गरज नव्हती. 

समोर गणरायाची आणि शिवरायांची मूर्ती ठेवली. गुरुजींनी गणरायाला पुष्पहार अर्पण केला आणि प्रार्थना सुरु झाली.
त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजेच गणरायाचा आशीर्वादच हे सांगायला आता आम्हाला कोणाचीच गरज नव्हती.

शाळेतून विध्यार्थ्यानी निरोप म्हणायला दिला खरा, पण सर्वच विद्यार्थी आमच्यासोबत दुसऱ्या शाळेची वाट चालू लागले. आमचे वजन कमी व्हावे म्हणून आमच्या हातात असणारे एक एक साहित्य त्यांनी आमच्याकडून घेतले व आम्हाला मदत करू लागले. २० मिनिटे पायी चालत दुसरी शाळा गाठली. शनिवारी ११ वाजता घरी जाणारे विद्यार्थी आज १ वाजेपर्यंत आमची वाट पाहत थांबले होते. जास्त वेळ न घालवता प्रार्थना संपवून ग्रंथदिंडीचे वाटप झाले. सोबतच प्रत्येक विद्यार्थ्याला चित्रकलेची वही, कंपास व रंगपेटी भेट दिली. सेल्फी आणि फोटो ला उधाण आले. कल्ला झाला आणि याच आनंदात उपक्रम कधी समाप्त झाला हे कळलेच नाही.

ग्रंथदिंडीचे वाटप झाले.

उपक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणून 'वदनी कवळ घेता' म्हणत सर्वानी चुलीवरच्या भोजनाचा आस्वाद घेतला. पोट आणि मन दोन्ही तृप्त झाले.

संकल्प गणेशोत्सवाचा २०१८ मोठ्या आनंदात, थाटात, आणि समाधानात पार पडला. दृश्य अदृश्य ज्यांनी हा उपक्रम सिद्धीस जाण्यास मदत केली, प्रेरणा दिली, उत्साह वाढवला त्या सर्वांचे मी प्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्याने आभार व्यक्त करतो. तसेच प्रगतीचे पंख व या पंखात भरारी देण्याचे अनेक उपक्रम व सेवा बाप्पा आमच्या हातून करवून घेऊ हिच गणरायाचरणी प्रार्थना करतो.
- रोशन मोरे 

(अध्यक्ष) 
चंद्रकोर प्रतिष्ठान

Wednesday, August 8, 2018

भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास

भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास ।
गेले आशापाश निवारूनि ॥१॥

विषय तो त्यांचा जाला नारायण ।
नावडे धन जन माता पिता ॥ध्रु.॥

निर्वाणीं गोविंद असे मागें पुढें ।
कांहींच सांकडें पडों नेदी ॥३॥

तुका म्हणे सत्य कर्मा व्हावें साह्य ।
घातलिया भये नर्का जाणें ॥४॥

English Meaning by M.K.Gandhi

He is a devotee who is indifferent about body, who has killed all desire, whose one object in life is (to find) Narayana, whom wealth or company or even parents will not distract, for whom whether in front or behind there is only God in difficulty, who will not allow any difficulty to cross his purpose. Tuka says: Truth guides such men in all their doings.

माझा अन्वयार्थ
जगतगुरु तुकोबाराय या ठिकाणी भक्तांची लक्षणे सांगतात किंवा भक्त कसा ओळखावा याची खुण सांगतात. देहातून उदास असणारे म्हणजेच मनातून आशापाश विसरून व स्वतःच्या शरीराबाबत ज्यांना आसक्ती नाही ते भक्त. ज्यांच्या जगण्याचा उद्देश व ध्येय हे नारायण म्हणजेच सत्कर्म झाला आहे व यामध्ये शरीराच्या गरजा किंवा मनाच्या इच्छा पूर्ण करण्याकडे ज्यांचे लक्षच नाही ते भक्त आहेत.

या नारायणाच्या भक्तीमध्ये भक्त इतके तल्लीन झाले आहेत  कि त्यांना धनाची आसक्ती नाही. आपले नाव मोठे व्हावे किंवा लोकांमध्ये आपल्याला मोठे मानाचे स्थान असावे अशी कोणतीच अपेक्षा नाही. एवढेच काय तर ते आपल्या कुठुंबाच्या आणि आपल्याला अधिक प्रिय असणार्या आई वडिलांच्या मायेतून देखील मुक्त झाले आहेत.

अशा भक्तांना देव देखील विसरत नाही. त्यांच्या प्रत्येक सुख दु:खात देव स्वतः सहभागी होतो. त्यांच्यावर कोणतेही संकट येउ देत नाही व ते निवारण्यासाठी त्यांच्या मागे पुढे उभा असतो. ह्या भक्तांना तो कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देत नाही.

तुकोबाराय सांगतात कि हे सत्कर्म करणारे भक्त देवाला सर्वाधिक प्रिय आहेत. ह्या भक्तांविषयी किंवा त्यांच्या सत्कार्याविषयी कोणी अफवा पसरवली व इतरांच्या मनात त्यांच्या कार्याची भीती निर्माण केली तसेच किंवा त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण केला तर त्यांना नरकात जावे लागेल व नरकयातना भोगाव्या लागतील. नर्क म्हणजेच दारिद्र्य व जनाचा दुस्वास व त्यामुळे होणार्या हालआपेष्टा म्हणजेच नरक यातना असा अर्थ घ्यावा लागेल.


तात्पर्य: कोणत्याही सत्कार्यात स्वतःच्या फायद्यासाठी अडथळा आणला तर कालांतराने त्याचा त्रास अधिक पटीने आपल्यालाच भोगावा लागतो. म्हणून जमलेच तर चांगल्या कार्याला सहकार्य करा पण त्यामध्ये अडथळे आणू नका.

Saturday, August 4, 2018

वारकरी म्हणजे काय?


वारकरी म्हणजे “जीवन जगण्याची सर्वोच्च पद्धत”
परम सत्य असणार्या अश्या विष्णू म्हणजेच पंचमहाभूतांवर परम श्रद्धा असणारा, क्रोध, वर्ण, अभिमानामध्ये न गुंतणारा, लीनतेने ओतप्रोत ओसंडून वाहणारा, ज्याचे चित्त नवनीताप्रमाणे शुभ्र व कोमल आहे असा हा जो कोणी तो वारकरी. यालाच जोड म्हणजे ज्याकडे नुसते पहिले तरी प्रसन्न वाटावे, असा आयुर्वेदिक तुळशीची माळ गळ्यात धारण करणारा, ज्याचा सहवासाचा सुगंध कायम दरवळावा असा गोपीचंदन कपाळी लेवणारा, ओंकाराचा ध्वनी कायम मनात गुंजत राहावा यासाठी हातामध्ये टाळ, विना घेऊन त्यातून ओंकार साकारणारा. मुळातच या विश्वात जगताना ज्याला वारकरी भवसागर म्हणतो, तो तरुन जाण्यासाठी सर्वोच्च जीवनशैली असणारा असा तो वारकरी.

या जीवनशैलीच्या मध्ये जो येईल त्याला शब्दबाण, काठी, वेळ आली तर तलवार दाखवणारा.

‘वार’ - अधर्मावर वार करून (मानसिक असेल किंवा सामाजिक)
‘करी’ - धर्म पुन्हा स्थापित करणारा.