अध्यक्षीय मनोगत व प्रवासवर्णन
संकल्प गणेशोत्सवाचा २०१८
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा..
चंद्रकोर प्रतिष्ठानच्या स्थापनेनंतरचे तिसरे वर्ष. स्थानिक पातळीवर खूप उंच उपक्रम राबवले गेले पण त्यातून समाधान काही लाभेना. परंतु यातील संकल्प गणेशोत्सवाचा हा एक उपक्रम असा होता कि ज्यात अतीव समाधान व प्रोत्साहन मिळत होते. पण हा उपक्रम विभागात साजरा होणार नव्हता म्हणून ज्यांना फक्त मिरवायचे आहे त्यांचा प्रतिसाद तसा कमीच व हे अपेक्षित होते. काहीही असो.. तोलमोल केले तेंव्हा लक्षात आले कि सोबत कोणी असो वा नसो हेच सत्य आणि सुंदर आहे. ज्या उद्देशाने प्रतिष्ठान स्थापन झाले होते त्याहिपेक्षा काही उत्तम आणि सुंदर करता येऊ शकते हे लक्षात आले आणि मग बडेजाव करणाऱ्या कार्यक्रमात मन रमेना.
महिन्याला आता काय नवीन असे विचारणारे व त्यानुसार सतत काहीतरी कार्यक्रम करत राहणारे प्रतिष्ठान आता शांत झाले. मुळात ज्यांच्यासाठी कार्यक्रम राबवायचे त्यांना याची जाण नव्हती, उलट विरोधच अधिक वाढू लागला होता. हा मार्ग एक दिवस आता शारीरिक लढाईवर घेऊन जाणार असे चित्र निर्माण झाले होते. पण सुसंस्कृत पिढीने असे हातापाईवर येणे हे देखील अशोभनीय आहे याची समजही स्वतःला घालून घेतली आणि प्रतिष्ठानचे स्थानिक कार्यक्रम एक एक करत कमी करू लागलो.
पण दुसऱ्या बाजूने संकल्प गणेशोत्सवाचा हा एकमेव उपक्रम मात्र अपेक्षेहून अधिक बहरू लागला होता. मग सर्व कार्यक्रमांवर खर्च होणारी आर्थिक व शारीरिक शक्ती या एकाच कार्यक्रमात एकवटायची व यापुढे कोणताही कार्यक्रम साजरा केला तरी तो शैक्षणिक सदरातच साजरा करायचा असे एकमताने ठरले. संकल्प गणेशोत्सवाचा २०१८ या उपक्रमाला नवीन उत्साह मिळाला.
संकल्प गणेशोत्सवाची दोन वर्ष रा. जि. प. शाळा आदई, ता पनवेल या शाळेला भेट दिली होती. पहिल्या वर्षी वह्या व पेन आणि दुसऱ्या वर्षी गणवेश असे शैक्षणिक पातळीवर आवश्यक साहित्य देऊन हा उपक्रम साजरा केला होता. यातच भर म्हणून शिवजयंती साजरी करताना विद्यादीप विद्यालय या स्थानिक शाळेला ग्रंथ दिंडी प्रदान केली होती. यावर्षी मात्र काही मित्रांनी विचारणा केली व त्यांच्या संस्थेतर्फे आदईच्या शाळेला मदत करण्याची इच्छा बोलून दाखवली. कोणीतरी या उपक्रमात उतरण्यास तयार आहे याचे समाधान लाभले व हि शाळा त्या मित्राला दिली.
![]() |
| आदई शाळेत साजरा झालेला संकल्प गणेशोत्सवाचा २०१७ |
![]() |
| आदई शाळेत साजरा झालेला संकल्प गणेशोत्सवाचा २०१६ |
या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी दुसऱ्या शाळेची शोधमोहीम सुरु असताना भिवपुरीहून गारबिट-माथेरान ट्रेकच्या वाटेवर असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या चिंचवाडी, ता. कर्जत व सागाचीवाडी, ता. म्हसळा या दोन शाळा नजरेत आल्या. भिवपुरीहून पायी चालत तब्बल २ तास अंतरावर असणाऱ्या या शाळा होत्या. गावाकडे व शाळेकडे वाहने जायला रस्ता नाही. शाळेचे गुरुजी रोज हि पायपीट करत विद्यार्थ्यांसाठी हा पल्ला पार करतात हे माहित झाले आणि या शाळेला भेटायची ओढ लागली. एका शाळेला शैक्षणिक साहित्य व दुसऱ्या शाळेला ग्रंथदिंडी देण्याचे शाळेच्या गुरुजींच्या सल्ल्याने मान्य केले.
गणेशोत्सवात सर्व साहित्य जमा झाले व शाळेला भेटण्याचा दिवस उजाडला. घाटकोपरवरून भिवपुरीकडे लोकलने प्रवास सुरु केला, लोकलमध्ये एका मित्राचा वाढदिवस साजरा करून प्रवासाचा आनंद व उत्साह वाढला होता. सकाळी ८ वाजता आम्ही भिवपुरी स्टेशनला उतरलो. पण आता खरी लढाई होती, कारण शैक्षणिक साहित्याचे प्रत्येकी किमान १० किलो वजन घेऊन १५०० फूट उंच डोंगरावर चढून जायचे होते. परंतु १७ जणांची तुकडी हे दिव्य करण्यास सज्ज होती. ३०० फुटांचा पल्ला गाठला आणि सर्वजण थकले त्यातच सूर्यदेवाची ऑकटोबर हिट आमच्यावर अन्याय करत होती. पाणी - इलेक्ट्रोल हे मनाचे सोपस्कार पार पडले आणि पुढील प्रवास सुरु झाला. आणखी १०० फूट चढल्यावर पुन्हा सगळे थांबले. आता फक्त १० मिनिटे, ५ मिनिटे असे करत करत आम्ही चढ पूर्ण केला आणि एका पठारावर येऊन थांबलो. पण अजूनही १.५ किलोमीटर इतके अंतर बाकी होते. ते चालण्यापूर्वी कांदेपोह्यांचा आणि सोबतच छायाचित्रांचा खेळ रंगला आणि थकवा कमी झाला. काही काळ विश्रांती झाल्यावर पुढच्या प्रवासाला सुरवात झाली.
| लोकलमध्ये एका मित्राचा वाढदिवस साजरा करून प्रवासाचा आनंद व उत्साह वाढला होता. |
| चढ पूर्ण केला आणि एका पठारावर येऊन थांबलो. |
काही अंतरा प्रवास केल्यावर शाळेची दोन मुले आमची वाट पाहत उभी आहेत असे दिसले. आम्ही त्यांच्या नजरेत पडताच हि मुले शाळेच्या दिशेने धावायला लागली "गुरुजी, पाहुणे आले" हि हाक त्यांनी गुरुजींना दिली. गावापासून १०० मीटरच्या अंतरावर असणारी शाळा गावात येणाऱ्यांचे स्वागत करायला वाटेत उभी होती. शाळेत दोन वर्ग आणि शाळेमागे लहानसे स्वच्छतागृह एवढीच हि शाळा. पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गाचा ४३ विद्यार्थ्यांचा पट असणारी हि शाळा तालुक्यातील सर्वाधिक पट असणारी शाळा असल्याचे गुरुजीनीं सांगितले. शाळा हस्तकलेने सुंदर सजवली होती. भिंतींवर देशाची, राज्याची, मंत्रिमंडळाची प्राथमिक माहिती व पाढे लिहलेले होते.
| गावापासून १०० मीटरच्या अंतरावर असणारी शाळा गावात येणाऱ्यांचे स्वागत करायला वाटेत उभी होती. |
| शाळा हस्तकलेने सुंदर सजवली होती. |
शाळेत पोहोचल्यावर चिमुकल्या हातांनी पाण्याचा ग्लास पुढे आला आणि सगळा थकवा शाळेबाहेरच राहिला. "जल अमृत आहे" असे का म्हणतात हे खऱ्या अर्थाने आमच्या लक्षात आले. अधिक वेळ न घालवता आम्हीही वह्या व शैक्षणिक साहित्य टेबलावर लावून घेतले. समोर गणरायाची आणि शिवरायांची मूर्ती ठेवली. गुरुजींनी गणरायाला पुष्पहार अर्पण केला आणि प्रार्थना सुरु झाली. "तू बुद्धी दे.. तू तेज दे.. नवचेतना विश्वास दे.. जे सत्य सुंदर सर्वथा.. आजन्म त्याचा ध्यास दे.." मुखातून या शब्दांबरोबरच डोळ्यातून अश्रू कधी तरळले हे कळलेच नाही. शहरात निर्दयी जगणाऱ्या माणसांच्या मनातही एवढा भाव असतो हे समजण्यासाठी हि परीक्षा देणे गरजेचे होते. प्रार्थना संपवून लगेचच शैक्षणिक वाटप झाले. त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजेच गणरायाचा आशीर्वादच हे सांगायला आता आम्हाला कोणाचीच गरज नव्हती.
| समोर गणरायाची आणि शिवरायांची मूर्ती ठेवली. गुरुजींनी गणरायाला पुष्पहार अर्पण केला आणि प्रार्थना सुरु झाली. |
| त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजेच गणरायाचा आशीर्वादच हे सांगायला आता आम्हाला कोणाचीच गरज नव्हती. |
शाळेतून विध्यार्थ्यानी निरोप म्हणायला दिला खरा, पण सर्वच विद्यार्थी आमच्यासोबत दुसऱ्या शाळेची वाट चालू लागले. आमचे वजन कमी व्हावे म्हणून आमच्या हातात असणारे एक एक साहित्य त्यांनी आमच्याकडून घेतले व आम्हाला मदत करू लागले. २० मिनिटे पायी चालत दुसरी शाळा गाठली. शनिवारी ११ वाजता घरी जाणारे विद्यार्थी आज १ वाजेपर्यंत आमची वाट पाहत थांबले होते. जास्त वेळ न घालवता प्रार्थना संपवून ग्रंथदिंडीचे वाटप झाले. सोबतच प्रत्येक विद्यार्थ्याला चित्रकलेची वही, कंपास व रंगपेटी भेट दिली. सेल्फी आणि फोटो ला उधाण आले. कल्ला झाला आणि याच आनंदात उपक्रम कधी समाप्त झाला हे कळलेच नाही.
| ग्रंथदिंडीचे वाटप झाले. |
उपक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणून 'वदनी कवळ घेता' म्हणत सर्वानी चुलीवरच्या भोजनाचा आस्वाद घेतला. पोट आणि मन दोन्ही तृप्त झाले.
संकल्प गणेशोत्सवाचा २०१८ मोठ्या आनंदात, थाटात, आणि समाधानात पार पडला. दृश्य अदृश्य ज्यांनी हा उपक्रम सिद्धीस जाण्यास मदत केली, प्रेरणा दिली, उत्साह वाढवला त्या सर्वांचे मी प्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्याने आभार व्यक्त करतो. तसेच प्रगतीचे पंख व या पंखात भरारी देण्याचे अनेक उपक्रम व सेवा बाप्पा आमच्या हातून करवून घेऊ हिच गणरायाचरणी प्रार्थना करतो.
- रोशन मोरे
(अध्यक्ष)
चंद्रकोर प्रतिष्ठान



No comments:
Post a Comment