हि कथा ११ जून २०११ रोजी माझ्या इतर ब्लॉगवर तसेच फेसबुकवर प्रसिद्ध झाली होती. पुरुज्जीवीत करण्यासाठी व आग्रहास्तव पुन्हा या ब्लॉग वर लिहीत आहे.
मला पावसाळ्यात नेहमीच हा प्रसंग आठवतो. मी माझ्या मुंबईचा दाखवलेला आणि सिद्ध केलेला मोठेपणा मला आजही सुखाऊन जातो. मी लहान म्हणजे ८-९ वर्षाचा असताना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावाला महाडला गेलो होतो. गावी मस्त दोन महिने राहिल्यावर पुन्हा मुंबईला यायला निघालो, तेंव्हा मला गावच्या काही मित्रांनी आणि माझ्या दादाने मस्करीत चिडवलं कि कशाला मुंबईला जातोस. आहे काय असं त्या मुंबईत..? इकडे पावसाळ्यात खूप मजा असते. नदीवर पोहायला जायचं, मासे पकडायचे, खेकडी पकडायची, हिरव्यागार रानात फिरायचं. आणि त्या मुंबईत काय ठेवलंय. मी लहान होतो त्यामुळे मला मस्करी समजली नाही. मला राग आला आणि मुंबईबद्दल असं ऐकल्यावर माझा स्वाभिमानही दुखावला. मी त्यांना सांगितलं. कि मुंबईत फिरलायत का कधी..? कधी पाहिलं नसेल असं सगळं काही आहे. त्यांनीही मला मुद्दाम म्हंटल, 'कि आहे ते सगळं बाकी वेळी पण पाहता येतं. पावसाळ्यात पाहण्यासारखं काय आहे?' मला पटलं. पण हार मानेल तो मी कसला. मी त्यांना सांगितलं, "कि पावसाळ्यात तिकडे "कॉफीची गंगा" येते. तुम्ही कधी पाहिलेय का...?"
हा नवीनच शब्द त्यांनी ऐकला. म्हणजे काय असं त्यांनी मला विचारलं. पण मी सांगितलं कि ते बघितल्यावरच समजतं. ज्याला कोणाला बघायची असेल त्यांनी मुंबईला चला. ते माझ्यावर हसायला लागले, आणि मी काहीतरी फेकतोय असं म्हणायला लागले. मी त्यांना म्हणालो, "वेड्यानो खूप मजा येते आमच्या कॉफीच्या गंगेत. ती जास्त वेळ नसते आणि कधीकधीच येते." त्यांना मी काहीतरी फेकतोय असंच वाटलं. पण मी माझ्या म्हणण्यावर ठाम होतो.
मी गावावरून मुंबईला आलो. शाळा सुरु झाली, नवीन वर्ग, नवीन पुस्तक आणि माझ्या मजेत मी ते सगळं विसरलो. जुलै महिन्यात दादा काही कामासाठी मुंबईला आला. मला भेटल्यावर म्हणाला, कि तुझी "कॉफीची गंगा" पाहायला आलोय. कुठे आहे मला दाखव. मी त्याला म्हंटल कि लगेच नाही दिसणार थोडे दिवस थांब. त्याचं काम होतं त्यामुळे तो थांबणारच होता. तो पूर्ण आठवडाभर आम्ही फिरत होतो. चौपाटी, राणीची बाग, गेट वे ऑफ इंडिया सगळं फिरवलं त्याला. आठवडा भर पाऊस काय जास्त नव्हता. रिम-झिम यायचा. पण मी मोठ्या पावसाची अपेक्षा करत होतो. त्याने मला बऱ्याचदा विचारलं, आणि फेकड्या काय पण फेकत असतो असं पण चिडवलं. पण सहा-सात दिवसांनी एकदाचा मोठा पाऊस आला. मुंबईची अवस्था मोठ्या पावसात खूप वाईट असते हे कोणाला सांगायला नको . जरासा मोठा पाऊस आला तरी मुंबईतल्या सखल भागात घरात पाणी शिरतं.
मी डोंगराच्या पायाशी राहायचो, आजही तिकडेच राहतो पण बराचसा बदल झाला आहे. माझ्या घराजवळ पाऊस आला कि डोंगरावरून भरपूर पाणी येते, नाले आणि रस्ते पूर्ण भरून वाहू लागतात. त्या पाण्याला इतका वेग असतो कि कोणता माणूस जरी त्यामध्ये सापडला तरी सहज वाहून जाईल. ते पाणी डोंगरावरून येतं त्यामुळे त्या मातीचा रंग आणि नाल्यातला पाण्याचा काळा रंग हे एकत्र झाल्याने त्याचा रंग कॉफी सारखा होतो. हे पाणी वाहू लागलं कि जास्त उंचावर नसलेल्या घरात पाणी शिरत आणि त्यांची तारांबळ उडते. कचऱ्यामुळे ते पाणी अडून राहतं. म्हणून लोक हातामध्ये मोठ्या काठ्या घेऊन घराबाहेर येतात आणि जसं जमेल तसा कचरा बाजूला करतात. त्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या मजेदार गोष्टी वाहत असतात. कोणी पाण्यात धडपडत असतं तर कोणी घाबरून बाजूला भिजत उभे असतात. कुत्रे आणि दुसरे कोणते प्राणी नसले तरी डुक्कर ह्या पाण्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडत असतात.
माझं घर दुमजली असल्याने आम्ही सगळे ग्यालरीमध्ये उभे राहून ही सगळी मजा पाहत असायचो. आणि कोणाला थंडी वाजते का...? कॉफी देऊ का..? असं गमतीने म्हणायचो. पाण्याचा वेग कमी झाला कि त्यामध्ये होड्या सोडायचो. ही सगळी मजा मी त्या दिवशी दादाला दाखवली आणि त्याला सांगितलं कि हीच ती "कॉफीची गंगा". त्यानेही माझ्यापुढे हात जोडले, आणि गावाला गेल्यावर सगळ्यांना सांगितले. त्याला हि कदाचीत माझे म्हणणे पटले होते. आणि आपण जिकडे राहतो तिकडे 'जसा आनंद घेता येईल तसा तो घ्यायचा' ही माझी कल्पना ही त्याला आवडली असेल. त्यानंतर जेंव्हा मी पुन्हा गावाला गेलो तेंव्हा सर्वांनी आवडली तुझी कॉफीची गंगा असंच सांगितलं. आजही जेंव्हा मला ते आठवतं तेंव्हा मी स्वतःवरच हसतो. आणि आजही मला माझ्या मुंबईचा अभिमानाच वाटतो. निसर्गाची मजा तर सगळेच अनुभवतात पण त्यातून काही निराळी मजा अनुभवायची असेल तर आमची मुंबईच श्रेष्ठ आहे.
- रोशन मोरे


