Saturday, July 13, 2019

लिंबू



२ वर्षांपूर्वीची गोष्ट.  शनिवारचा दिवस. ऑफिसला पोहोचलो. पार्किंग मधेच ऑफिसमधला मित्र भेटला. हात मिळवून गुड मॉर्निंग झालं. बाईक न्याहाळताना चटकन हसून म्हणाला, "लिंबू? हि असली अंधश्रद्धा मानतोस तू? वेड्या, लिंबू लावून गाडी सुरक्षित झाली असती तर बाईकला ए बी एस, कार ला एअर बॅग कशाला दिल्या असत्या? लिंबू लावून दिला असता कंपनीने." आणि जोरदार हशा. मी ही हसलो. गोष्ट पटण्यासारखी होती म्हणून मी हि होकारार्थी मान हलवत त्याला साथ दिली. लिंबू काढुन डस्टबिन मध्ये फेकला. कुत्सित नजरेने माझी चेष्टा करतच त्याने ऑफिस मध्ये प्रवेश केला.

लंचला पुन्हा भेट झाली. त्याने सर्वांसमोर पुन्हा तोच विषय काढला आणि पुन्हा मी चेष्ठेचा धनी. मी म्हंटल त्याला, "अरे काढला ना पण तुज्यासमोरच?" "पण तू गाडीला लावलासच का?" पुन्हा हसत प्रश्न.

यावेळी टाळणं जमलं नाही. "बघ, श्रद्धा किंवा अंधश्रद्धा मी किती मानतो हे मला जवळून ओळखणाऱ्या व्यक्तींना चांगलं ठाऊक आहे. लिंबू घेणं हि माझी श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नव्हे. मी शनिवारी लिंबू गाडीला लावतो, फक्त सिग्नल ते ऑफिस पार्किंग." 'अरे पण का?" पुन्हा प्रश्न.

"बेरोजगारीच्या नावाखाली सरकारला शिव्या देत घरात बसणारे मी बरेच जण पाहतो. शिक्षण झालं पण चांगली नोकरी मिळत नाही असे म्हणणारे हि बरेच पहिले. पण सरकार, आईबाप, नातलग यांकडे तक्रारी करत बसण्यापेक्षा ऊन, वारा, पाऊस या तीनही ऋतूमध्ये म्युनिसिपल शाळेच्या कपड्यांवर लिंबू विकणारा तो छोटा सिग्नलला पहिला कि मला पुन्हा विश्वास होतो कि भारताचे भविष्य उज्वल आहे. दर शनिवारी मी त्या सिग्नलची वाट बघतो. तो ज्या दिशेला उभा असेल तिकडे बाईक वळवतो. त्याच्या हातात दहा रुपये दिले कि तो सिग्नल सुटायच्या आत चपळाईने मिरच्यांसोबत गुंफलेला लिंबू बाईकला बांधतो आणि मी घेत नाही हे माहित असतानाही सुट्टे पैसे न चुकता परत देण्यासाठी त्याचा हात वळतो. मला त्याच्या डोळ्यात उद्याचा सोनेरी देश दिसतो. माझ्या विकेंडला खऱ्या अर्थाने इथे सुरवात होते. अंधश्रद्धा वाढू नये म्हणून मी ऑफिसच्या पार्किंगमध्ये तो लिंबू डस्टबिन मध्ये फेकतो. सिग्नल ते ऑफिस जर माझी अंधश्रद्धा देशाच्या भविष्याला हातभार लावणार असेल तर मी आहे अंधश्रद्धाळू आणि मी ते आनंदाने स्वीकारतो."

"ग्रेट थॉट" एवढं म्हणून डब्बा बंद झाला. सकाळपासून डोंगराएवढी झालेली गोष्ट पुन्हा छोटी झाली.

माझं ऑफिस बदलल्यावर तो मार्ग बंद झाला होता. आज त्याच मार्गावरून जाताना, एक लहानगा "साहेब, लिंबू? म्हणत प्रश्नार्थक नजरेने समोर आला. कित्येक दिवसानी आज पुन्हा अंधश्रद्धाळू होण्याचा योग आला आणि आठवणी ताज्या झाल्या.

-रोशन मोरे